राहुल गांधी यांचे निकटवर्तीय ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसला रामराम 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनं मध्य प्रदेश सरकार धोक्यात आलयं.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहदेखील सोबत होते. त्यामुळे ज्योतिरादित्य भाजपमध्ये प्रवेश करणार अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार असल्याचंही कळत आहे. दोन दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं समोर येत आहे. या चर्चेनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या फॉर्म्युल्यावर सहमती झाल्याचं कळतंय. राज्यसभेच्या उमेदवारी शिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांचा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदही हवं आहे.

काँग्रेसचे निष्ठवंत म्हणून, ज्योतिरादित्य शिंदे यांची ओळख होती. पण, मुख्यमंत्री कलमनाथ आणि ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्यात असलेले मतभेद टोकाला गेल्यामुळं अखेर त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही आठवड्यांपासून ही खद् खद सुरू होती. गेल्या आठवड्यात काँग्रेसचे 11 आमदार बेपत्ता झाल्याची चर्चा होती. पण, त्यातील नऊ आमदार टप्प्या टप्प्याने माघारी आले. काल सायंकाळी मात्र, काँग्रेसचे 15 ते 17 आमदार, बेंगळुरूला निघून गेल्याची चर्चा सुरू झाली. त्याचवेळी ज्योतिरादित्य शिंदे यांची भाजपमधील बड्या नेत्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यामुळं काल रात्रीच ज्योतिरादित्य शिंदे यांचा भाजपप्रवेश होणार हे निश्चित झाले होते. 

विशेष म्हणजे मध्यप्रदेश विधानसभेचं अधिवेशन 15 मार्चपासून सुरू होत आहे. अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी भाजप अविश्वास प्रस्ताव सादर करुन काँग्रेसचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्याची दाट शक्यता आहे. ज्योतिरादित्य शिंदेंचे समर्थक असलेल्या मध्य प्रदेश काँग्रेसमधील 17 आमदारांनी बंडाचा पवित्रा घेत बंगळुरू गाठलं आहे. या आमदारांमध्ये कमलनाथ सरकारमधील 6 मंत्र्यांचाही समावेश आहे. 16 मार्चला विधानसभेच्या पहिल्या सत्रात भाजपकडून अविश्वास ठराव आणला जाऊ शकतो. या आमदाराच्या समर्थनाच्या जोरावर काँग्रेसचं सरकार पाडण्याचा भाजपकडून प्रयत्न असणार आहे.


मध्य प्रदेश विधानसभेत एकूण 230 जागा आहेत. 230 मधील दोन जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे सध्या विधानसभेत 228 आमदार आहेत. ज्यामध्ये 114 काँग्रेस, 107 भाजप, 4 अपक्ष, 2 बहुजन समाज पक्ष आणि एक समाजवादी पक्षाचा आमदार आहे. काँग्रेसला या चारही अपक्ष आमदारांसह बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा आहे.

काही महिन्यांपूर्वीच ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्वीटर अकाउंटवरील बायोमधून काँग्रेसच्या पदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य हे काँग्रेसपासून दूर जात असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. मात्र त्यावेळी ज्योतिरादित्य यांनी या चर्चांच खंडण केलं होतं.दरम्यान, आज ज्योतिरादित्य शिंदे याचे वडील माधवराव शिंदे यांची जयंती. यानिमित्तानं काँग्रेसने त्यांना आदरांजली वाहिली. माधवराव काँग्रेसचे निष्ठावंत त्यांनी केंद्रात रेल्वेमंत्री म्हणूनही काम केले होते. नऊ वेळा खासदार होण्याचा पराक्रम त्यांनी केला होता. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे जवळचे मित्र म्हणूनही त्यांची काँग्रेसमध्ये वेगळी ओळख होती. आज, त्यांची जयंती असल्यामुळं काँग्रेसने त्यांच्या अधिकृत पेजवरून त्यांना आदरांजली वाहिली आहे. एका बाजुला ज्योतिरादित्यांचे बंड आणि दुसरीकडे त्यांच्या वडिलांची जयंती. जयंतीनिमित्त काँग्रेसनं वाहिलेले आदरांजली, असा योगायोग जुळून आलाय. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने