मुंबई - मध्य प्रदेशातील राजकीय भूकंपानंतर महाराष्ट्रातही 'ऑपरेशन लोटस' सुरु आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार, असे भाकीत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच केले होते, त्यामुळे कोणता मासा गळाला लागणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यातील भाजप नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 105 जागा मिळाल्या. पण मध्य प्रदेशात काँग्रेस 115 जागांसह नंबर एकवर तर 105 जागांसह भाजप दुसऱ्या नंबरवर अशी स्थिती होती. त्यामुळेच सुरुवातीला भाजपने सत्तास्थापनेचा दावाही केला नाही, भाजप शांत राहिली. पण महाराष्ट्रात नंबर एकवर असलेल्या भाजपने शिवसेना सोबत येत नाही म्हटल्यावर अजित पवारांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो अवघ्या 40 तासांमध्येच फसला. त्यामुळे आता दुसरा प्रयोग करण्याचं धाडस करण्याआधी भाजपला बरीच काळजीही घ्यावी लागणार आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी सत्तेवर येऊन साडेतीन महिने झाले, परंतु शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणाने कुरबुर सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए संदर्भात घेतलेली भूमिका, मुस्लीम आरक्षणबाबत मौन, अयोध्या दौरा यामुळे महविकास आघाडीमध्ये सख्य राहिलेले नाही. हे सरकार केव्हाही कोसळू शकते, हे जरी खरे असले तरी भाजप नेत्यांना हे सरकार लवकरात लवकर कोसळावे अशी मनोमन इच्छा दिसते आहे.
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे तर मग महाराष्ट्रात कोण? मध्य प्रदेशात 15 महिन्यानंतर तर मग महाराष्ट्रात कुठली वेळ? मध्य प्रदेशात होळीचा मुहूर्त तर महाराष्ट्रात कुठला? असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा