राज्यातील मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून महाविकासआघाडीत असलेली मतमतांतरे नुकतीच समोर आली, त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला चुचकारण्याचा प्रयत्न सुरु आहेत. गरज पडल्यास आम्ही आम्ही शिवसेनेच्या पाठिशी उभे राहू, असे वक्तव्य राज्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले असल्याचे समजते.
उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम आरक्षणांसदर्भात घेतलेली भूमिका अगदी योग्य आहे. यापूर्वी शिवसेना आणि भाजपमध्ये असलेल्या युतीला विचारसरणीचा आधार होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर दबाव आणत असतील तर उद्धव ठाकरे यांनी चिंता करण्याचे कारण नाही. समजा उद्या यावरून काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकारचा पाठिंबा काढला तरी आम्ही या मुद्द्यासाठी सरकारला पाठिंबा देऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यासंदर्भात महाविकासआघाडीत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट केले होते.
मुस्लिम आरक्षणासंदर्भात अजून शिवसेनेला भूमिका ठरवायची आहे. हा मुद्दा प्रत्यक्षात चर्चेला येईल तेव्हा बघू, असे उद्धव यांनी सांगितले होते. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनीही दुजोरा दिला होता. नवाब मलिक यांनी मंत्री म्हणून आपली भूमिका मांडली होती. आम्ही तिन्ही पक्ष यावर लवकरच चर्चा करु, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते.
टिप्पणी पोस्ट करा