वैजापूर - निजामशाही पासून आजतगायत वैजापूर तालुक्यासाठी रस्ता व पाणी हे नेहमीच कळीचे मुद्दे ठरले आहेत.तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहता रस्त्यांची दुरुस्ती किंवा नूतनीकरण हे फक्त त्या कामाचे बिल लाटण्या पुरतेच होते हे सर्वत्र रस्त्यांच्या अवस्था पाहता लक्षात येते.
याच पद्धतीचा आणखीन एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. तालुक्यातील शिऊर ते वडजी या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी १५ किलोमीटर रस्त्यासाठी बांधकाम विभागाने चक्क ३ कोटी.३६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या मध्ये डांबरीकरण, नाल्या काढणे, फूटपाथ भरणे व वृक्ष लागवड या सारखे कामे या निधीतून पुर्ण करावयाची आहे. मात्र हे काम करताना पूर्वीच्याच खराब रस्त्यावर खडीचा चुरा टाकून त्यावर डांबर टाकल्या जात आहे.
याशिवाय सुरू असलेल्या रस्त्याची जाडीही असमाधानकारक आहे. या रस्त्याचे काम करीत असलेल्या ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर ठेऊन हे उरकण्याची लगीन घाई सुरू केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला सुरू असलेल्या या निकृष्ट कामाबद्दल जाब विचारला असता ठेकेदार त्यांना थातूर मातूर उत्तर देऊन विषयाला बगल देत आहे. अखेर ग्रामस्थांनी येथील सार्वजनिक विभागाचे उपअभियंता बाबूलाल चव्हाण यांना सदरील निकृष्ट कामाबद्दल माहिती दिली व पुरावा दाखल या कामाचे व्हिडीओही दिले. मात्र त्यांनी ग्रामस्थांना ठेकेदार माझे ऐकत नाही असे अजब उत्तर दिल्याने ग्रामस्थांपुढे जावे तरी कुणा दारी ? असा यक्ष प्रश्न पडला आहे. अखेर हा सर्व प्रकार ग्रामस्थांनी शिवसेना महीला आघाडीच्या आनंदीताई अन्नदाते सेनेचे उपतालुका प्रमुख गोकुळ आहेर यांच्याकडे कथन केल्याने त्यांनी थेट वैजापूर येथील बांधकाम विभागाचे कार्यालय गाठत उपअभियंता बाबूलाल चव्हाण यांना सुरू असलेल्या निकृष्ट कामात लक्ष द्या अशी मागणी केली. जर सार्वजनिक बांधकाम विभागाने याविषयी झोपेचे सोंग आणले तर त्यांना खोट्या झोपेतून जागे करण्यासाठी नाही लवकरच आम्ही शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडु असा इशाराही त्यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा