विद्याताई, जरा लाज बाळगा !

खरेतर असे म्हटले जाते की एक स्त्री शिक्षित झाली तर तिचे संपूर्ण कुटुंब  शिक्षित करते,  सुसंस्कृत करते पण सदृढ आणि चांगला समाज घडवायला संस्कार महत्त्वाचे असतात. केवळ शिक्षण,पैसा,प्रतिष्ठा असून जर सुयोग्य संस्कार, घरातील महिलांबाबत सन्मानपूर्वक वागणूक देऊ शकत नसतील तर अशा स्त्री ला एक स्त्री म्हणवून घ्यायचीही लाज वाटायला हवी .राष्ट्रवादीच्या महिला आमदार विद्या चव्हाण यांनी आपल्याच सुनेचा नातू हवा म्हणून जो छळ केला, याला काय म्हणावे ?

बहिणाबाईं चौधरींनी ‘माझ्या जीवा’ या कवितेते अखेरीस लिहून ठेवलेले आहे, 
हास हास माझ्या जीवा,असा संसारात हास !इडा पीडा संकटाच्या तोंडावरे कायं फास !!
जग जग माझ्या जीवा, असं जगनं तोलाचं !उच्च गगनासाराख्या धरत्रीच्या रे मोलाचं !!


म्हणजेच प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी जे जे उत्तम,उत्तुंग ते टिपण्याचा प्रयत्न करत असते.  आयुष्याच्या सोंद्यातील अगदी छोटे मोठे क्षण गोळा करत स्वत:सोबत कुटुंबातील इतर सदस्यांचेही जीवन समृद्ध करत असते. कुटुंबाचा विस्तार, संवर्धन हे अधिकांशी तिच्याच हातात असते. परंतु विद्या चव्हाणांसारखी प्रतिष्ठित राजकारणीच जर आपल्या सूनेकडे मुलगा हवा अशी मूर्खपणाची मागणी करत असतील तसेच त्यानंतर ते आरोप फेटाळून लावत याऊलट घरातील सूनेच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवत खोटे आरोप करत असतील तर सर्वसामान्य घरातील मानसिक व शारिरीक अत्याचारित महिलांची किती वाईट आणि द्ययनीय परिस्थिती असू शकेल याचा आपण विचारही करू शकत नाही.

महाराष्ट्रातच एकीकडे  आपल्या सूनेला मुलगी झाल्यावर तिचा व नवजात मुलीचा खूप थाटामाटात सोहळा  साजरा करणारे सर्वसामान्य नागरिकही आहेतच,  पण मुलगाच हवा म्हणून विद्या चव्हाण सारखे  नाकं मुरडणारे आणि  छळ मांडणारे सुद्धा या समाजात आहेत.फक्त काहींच्या गोष्टी समाजात उघड होतात तर काहींच्या घरातील चार भिंतीतच स्तिमित रहातात.

जर घरातील महिलेची/ देवीरूपी स्त्री शक्तीची अशी अवहेलना होत असेल तर नवरात्रीत केवळ देवीच्या विविध रुपांची पूजा करण्यात काहीच अर्थ रहात नाही. समाजात चाललेल्या विपरीत परिस्थितीला कुटूंबातील मुख्य व्यक्ती जेवढी जबाबदार आहे तसेच काही अंशी समाजही जबाबदार असतो. मग त्यात व्हाटस् अ‍ॅप, फेसबुक, टिकटॉक, युट्युब अशी समाजमाध्यमे असोत की खाजगी वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट ! त्यांमध्येही अनेकदा मुलगा हवा मुलगी नको किंवा तत्सम विचारधारा कळत- नकळत दर्शविलेली दिसते. किंवा सासू सून नवरा बायको या नात्यांवरील विनोदातही सूनेला किंवा एखाद्या स्त्री ला लक्ष्य केले जाते.

शेवटी हे भयाण वास्तव बदलण्यासाठी समाजातूनच सर्व स्तरातील माणसांनी पुढे येऊन, जनजागृती करून  सुसंस्कृततेचा वारसा अंगीकारणे जरूरी आहे. महाराष्ट्राने दोन विद्या पाहिल्या ,एक स्त्री हक्क चळवळीतील लेखिका,  महिलांच्या  उन्नतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ आणि दुसरी म्हणजे सामाजिक कामाचे सोंग आणून घरातीलच जवळच्या महिलेचे खच्चीकरण करणारी धूर्त राजकारणी विद्या चव्हाण आणि आज या महाराष्टाला चांगल्या विद्येचीच गरज आहे याचा सर्वांनी गंभीर विचार करायलाच हवा.

एखादी स्त्रीच ही स्त्रीची शत्रू बनून तिचे आयुष्य देशोधडीला लावण्याचे कारस्थान करू शकते हे यातून स्पष्ट होते.ममता , मातृत्व या शब्दांना भेदून टाकण्याची ताकदही एका स्त्रीत असते.जन्माला घातलेल्या बालकावर नुकतेच या जगात पदार्पण करणार्‍या बालिकेला कॅरीबॅगमध्ये गुंडाळून गटाराच्या कडेला, उकीरडयावर, रस्त्याच्या किनार्‍यावर फेकून जाणारीही महिलाच असते. संतापाच्या भरात स्वत:सह आपल्याच चिमुकल्यांनाही आत्महत्येचा मार्ग अवलंबून गळफास आवळत, कधी जाळून घेत, कधी रेल्वे समोर तर कधी विहिरीत उडी मारून मृत्यूच्या दाढेत ढकलणारीही महिलाच असते. असे विदारक सत्य वृत्तपत्रांमधून वाचले जाते.

समाजातील बर्‍याच कौटूंबिक घटनांच्या मुळांशी जाऊन पाहिले तर अनेकदा घटनांचे मूळ हे एका महिलेपर्यंतच पोहचलेले असते. अनेकदा नवरा - बायको यांतील घटस्फोटाचे कारणही सासूच असते. महिलांच्या बाबतीत असलेला राग, द्वेष या उद्देशाने हे लिखाण नसून त्यांच्यातील विध्वंसक, विनाशकारी, समाजात असंतोष पसरविणार्‍या प्रवृत्तींच्या विरोधात आहे .मीही एका आईच्याच पोटी जन्म घेतला आहे, खरेतर माझ्या आईला मुलगी हवी होती आणि मी मुलगीच झाले.,त्यामुळे महिलांविषयी माझ्या मनात तीव्र द्वेष मुळीच नाही. याऊलट महिला किंवा स्त्री असण्याचा गर्व आहे जो प्रत्येकीला असायला हवा. कारण पुरुषांपेक्षा महिलांची मानसिक व शारिरिकदृष्ट्या सहन करण्याची ताकत अधिक असते. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ याप्रमाणे प्रथम महिलांनीच महिलांना सहकार्य केले तर कौटुंबिक पर्यायाने सामाजिक जीवन धोक्यात येणार नाही.


- स्वप्ना काळे



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने