दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा कहर वाढतच चाललेला आहे. आता हा जीवघेणा व्हायरस भारतातही पसरत आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु भारत सरकार या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवत असून याबाबत सातत्याने ठोस पावलं उचलली जात आहेत.
त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भारताने तीन देशांच्या नागरिकांना भारतात प्रवेशण्यासाठी तात्पुरती बंदी घातली आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. या देशातील नागरिकांना सध्या भारतात येण्याची परवानगी नाही. अजूनपर्यंत देशात दाखल न झालेल्या, प्रवेश न केलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांच्या नियमित आणि ई-व्हिसावर बंदी घालण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, लोकांना चीन, इटली, ईराण, रिपब्लिक ऑफ कोरिया, जपान, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये प्रवास न करण्याबाबत सांगितलं आहे. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता आरोग्य मंत्रालयाने या देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसंच, इटली आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना व्हायरसचं निगेटिव्ह प्रमाणपत्र असणं अनिवार्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.
'ब्यूरो ऑफ इमिग्रेशन'कडून एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. भारतात अद्याप प्रवेश न केलेल्या, परंतु नियमित आणि ई-व्हिसा जारी करण्यात आलेल्या फ्रान्स, जर्मनी आणि स्पेनमधील नागरिकांचा व्हिसा त्वरित रद्द करण्यात येत असल्याचं, नोटिफिकेशनमध्ये जाहीर करण्यात आलं आहे.
कोरोना व्हायरस प्रभावित देशांतून मंगळवारी आलेल्या ३५३४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत कोरोना व्हायरस प्रभावित देशांतून आलेल्या १,५३,४१७ प्रवाशांची दिल्ली विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. देशातील अनेक मोठ्या विमानतळांवर आलेल्या प्रवांशाची तपासणी करूनच देशात प्रवेश देण्यात येत आहे, त्यासाठी तेथे थर्मल डिटेक्टर मशीन्स लावलेली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा