जे लोक सकाळी लवकर कामानिमित्त घराबाहेर पडतात, त्यांना गरम पाण्याची विशेष आवश्यकता भासते. पण स्नानासाठी वापरण्यात येणारे पाणी किती गरम असावे, ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. काही व्यक्तींना अगदी कडकडीत पाण्याने स्नान करावयाची सवय असते. पण अतिगरम पाण्याने स्नान केल्या मुळे त्वचा आणि केस या दोहोंनाही हानी होऊ शकते.
अति गरम पाण्याने स्नान केल्याने त्वचा लालसर दिसू लागते. त्वचा अधिक कोरडी पडून खाज सुटू लागते आणि क्वचित प्रसंगी रॅशेस येऊ शकतात. तसेच या मुळे स्किन इन्फेक्शन चा धोका उद्भवू शकतो. केस अति गरम पाण्याने धुतल्यामुळे त्यांची चमक कमी होऊन केस अधिक कोरडे, रुक्ष दिसू लागतात. अति गरम पाण्याने स्नान केल्याने डोळेही कोरडे पडून खाजू लागतात. डोळ्यांमध्ये लाली दिसून येते आणि सतत पाणी येऊ लागते. डोक्याचा स्काल्प कोरडा पडतो. त्यामधील आर्द्रता घटते. अश्या परिस्थितीमध्ये केसांची मुळे देखील कमकुवत होऊन केस तुटू शकतात, तसेच डोक्यामध्ये कोंडा उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण होते. अति गरम पाण्याने त्वचेमधील आर्द्रता कमी होऊन हात-पाय अतिशय कोरडे पडू लागतात. तसेच या मुळे नखांना देखील हानी पोहोचू शकते. नखांमधील आर्द्रता कमी होऊन, नखे कमकुवत होऊन तुटणे, त्यांच्यामध्ये फंगस निर्माण होणे अश्या तक्रारी उद्भवू लागतात. तसेच नखांच्या आसपासची त्वचा कोरडी पडून तिथे भेगा पडल्याप्रमाणे व्रण दिसून येतात. तसेच त्वचेच्या टिश्यूंना हानी पोहोचत असते. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या पडून व्यक्ती अकाली वयस्क दिसू लागते. तसेच त्वचा कोरडी पडल्याने निस्तेज दिसू लागते. हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी अति गरम पाण्याने वारंवार स्नान करणे टाळावे.
गरम पाण्याने स्नान केल्यानंतर त्वचा कोरडी पडू नये या साठी चांगल्या प्रतीच्या मॉईश्चरायजरचा वापर करावा. केस कोरडे, रुक्ष होऊ नयेत यासाठी आठवड्यातून किमान एकदा चांगल्या प्रतीच्या हेअर ऑईलने केसांना मालिश करावे. केस धुण्यासाठी वापरायचे असलेले पाणी कोमट असावे. केस शँपूने धुवून झाल्यानंतर त्यांना चांगल्या प्रतीचा कंडीश्नर लावण्यास विसरू नये.
टिप्पणी पोस्ट करा