येस बँकेच्या राणा कपूरच्या मुलीला विमानतळावर रोखलं 

मुंबई - लंडनला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या राणा कपूर यांची मुलगी रोशनी कपूर हिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलंय. दरम्यान राणा कपूर यांना ११ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) ताब्यात ठेवलं गेलंय. त्यांच्याविरुद्ध 'क्रिमिनल कॉन्सपिरन्सी'चा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

येस बँकेचे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तब्बल 31 तास चौकशी केल्यानंतर ईडीने राणा यांना अटक केली होती. येस बँक प्रकरणी राणा यांच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आहे. आज पहाटे 4 वाजता त्यांना अटक करण्यात आली. काल मध्यरात्रीपासून त्यांची चौकशी केल्यानंतर दुपारी ईडी कार्यालयात त्यांना आणण्यात आलं होतं. त्यानंतर कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

येस बँक प्रकरणात चौकशी यंत्रणांनी राणा कपूर कुटुंबाला घेरलंय. येस बँक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूर आणि त्यांचे कुटुंबीय पुरते अडकलेत. लुक आऊट नोटीस जारी करण्यात आल्यानंतरही राणा कपूर यांची मुलगी रोशनी भारत सोडून लंडनला रवाना होण्याच्या प्रयत्नात होती. ही माहिती मिळताच रोशनी कपूर हिला मुंबई विमानतळावरच रोखण्यात आलं. राणा कपूर यांचा जावई आदित्य याच्याविरुद्धही लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलंय.

सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशी दरम्यान राणा कपूर यांची काही गुंतवणूक संशयाच्या घेऱ्यात आहे. राणा कपूर यांनी २००० करोड रुपयांहून अधिक किंमतीच्या संपत्तीत गुंतवणूक केल्याचं समोर येतंय. ही संपत्ती भारतातच आहे. ही संपत्ती खरेदी करण्यासाठी काळा पैसा वापरल्याचा संशय चौकशी यंत्रणांना आहे. तसंच कपूर यांच्या युनायटेड किंगडममध्ये असलेल्या काही संपत्तीचाही खुलासा झालाय.


मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शेल कंपन्या सुरू करून काळी संपत्ती गोळा केल्याचा आरोप राणा कपूर यांच्यावर करण्यात आलाय. कर्ज चुकवण्याची कुवत नसतानाही दिवाण हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला (डीएचएफएल) राणा कपूर यांच्या मदतीनं कर्ज पुरवण्यात आल्याचे पुरावेही ईडीला सापडलेत. राणा कपूर यांची पत्नी बिंदू कपूर आणि त्यांच्या तीन मुली राखी कपूर - टंडन, रोशनी आणि राधा यांच्या नावावरही अनेक कंपन्या आहेत.

देशातील अनेक दिग्गज व्यावसायिकांद्वारे सुरू करण्यात आलेली खासगी येस बँक संकटात आहे. 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'नं बँकेचा कारभार आणि बोर्डाचं संचालन आपल्या हातात घेतलंय. गुंतवणुकदारांना बँकेतून ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा देण्यात आलीय.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने