आमदार अतुल भातखळकर यांचा आरोप
मुंबई - कोरोना रुग्ण असलेला मालाड पूर्व येथील रहिवासी आणि डबेवाले संघटनेचा सदस्य संतोष जाधव हा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणाचा बळी असल्याचा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी स. का. पाटील हॉस्पिटलच्या डॉक्टरांविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल केली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांच्या मतदारसंघात राहणाऱ्या संतोष जाधव या अवघ्या 38 वर्षाच्या कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू मालाड पूर्व येथील स. का पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 24 जून रोजी झाला. स. का. पाटील रुग्णालयात दाखल असलेल्या या रुग्णाला नायर रुग्णालयांमध्ये हलविण्याचा प्रयत्न रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी केला. परंतु नायर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांकडून आधीच स्पष्टपणे कळविण्यात आले होते की रुग्णालयात अतिदक्षता विभागात बेड उपलब्ध नाही त्यामुळे रुग्णाला पाठवू नये. या रुग्णाला जर का स. का. पाटील रुग्णालयातून हलविण्याची आवश्यकता होती असे तेथील डॉक्टरांचे मत होते तर त्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क का केला नाही? त्याचबरोबर जवळपासच्या कोणत्याही रुग्णालयात चौकशी केली होती का? महानगरपालिकेने वॉर्ड स्तरावर जे वॉररूम स्थापन केले आहेत त्यांच्याकडे अतिदक्षता विभागातील बेड उपलब्धते बाबतची मागणी कळवली होती का? एका साध्या ॲम्बुलन्स मधून या रुग्णाला का नेण्यात आले? अशा सर्व प्रश्नांची विचारणा आमदार भातखळकर यांनी प्रशासनाला केली आहे. त्यामुळे या संपूर्ण हलगर्जीपणाची चौकशी करावी आणि दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमदार भातखळकर यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा