मुंबई - महात्मा गांधींप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणसाला विश्वासात घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीमुळेच कोरोना सारख्या संकटावर आपण मात करू शकलो. असे नेतृत्व मिळणे हे देशाचे भाग्यच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी शुक्रवारी केले. तर नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करत देशाच्या अर्थकारणाला नवी दिशा दिली , असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त प्रदेश भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल सभेला संबोधित करताना श्री. तोरसेकर, श्री. फडणवीस बोलत होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही. सतीश, मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर , ज्येष्ठ नेते विनोद तावडे आदी मान्यवर या व्हर्च्युअल सभेला उपस्थित होते.
श्री. तोरसेकर यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांच्या स्वभावाचे , कार्यशैलीचे वेगवेगळे पदर उलगडून दाखविले. ते म्हणाले की, मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांना अभिप्रेत असलेले स्वयंसेवकत्व अंगी पूर्णपणे बाणवले आहे. पंतप्रधानपदासारख्या अत्युच्च पदावर विराजमान झाल्यावरही मोदी यांनी आपल्यातला स्वयंसेवक , कार्यकर्ता जपलेला आहे. आपल्या संघटनेची विचारधारा अंमलात आणण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती , संयम मोदींकडे असल्याने 370 वे कलम रद्द करणे , तिहेरी तलाक रद्द करणे, रामजन्मभूमीवर मंदिर उभारणे या गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या. आपल्या विचारांवर , आपल्या कृतीवर नितांत विश्वास असल्याने टीकाकारांकडे दुर्लक्ष करीत मोदी निर्धारपूर्वक वाटचाल करीत आहेत.
गांधीवाद्यांनी महात्मा गांधी यांना कधी पूर्णपणे समजून घेतले नाही. मात्र नरेंद्र मोदी यांनी गांधीजींना पूर्णपणे समजून घेतले आहे. सामान्य माणसाला विश्वासात घेत महात्मा गांधींनी स्वराज्याचा लढा ज्या प्रमाणे व्यापक बनविला त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या काळात सामान्य जनतेला साद घालत लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यश मिळवले. त्यामुळेच आपण कोरोनाला अटकाव करू शकलो. मोदी यांच्यावर टीका करण्यापूर्वी विरोधकांनी त्यांना पूर्णपणे समजून घेतले पाहिजे, असेही श्री. तोरसेकर यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा वर्षांत देशाला बलशाली , विकसीत राष्ट्र बनविण्यासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचा आढावा घेतला. मोदी यांनी दिल्लीतील भ्रष्ट व्यवस्था मोडीत काढत केंद्र सरकारच्या कारभारात कार्यक्षमतेची नवी व्यवस्था निर्माण केल्याचेही श्री. फडणवीस यांनी नमूद केले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहात राज्यात भाजपातर्फे प्लाझ्मा दान, दिव्यांगांना अवयवदान , रक्तदान यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आ. अतुल भातखळकर यांनी सूत्रसंचालन केले.
अगदी बरोबर आहे... भाऊ तोरसेकर हे अभ्यासू पत्रकार आहेत.. त्यांना राजकारणातील गाढा अभ्यास आहे.आदरणीय भाऊ तोरसेकर यांच्या मतांशी सहमत आहे.आता उगाच लोकं बेरोजगार दिवस म्हणून पंतप्रधान यांना ट्रोल करत आहेत.ते चुक आहे.
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा