मुंबई - सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर कारागृहाच्या बाहेर आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिले आहे. 'उद्धव ठाकरे, ऐका माझं. तुमचा पराभव झालाय, खेळ आता सुरु झालाय' असे म्हणत प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचे लवकरच मराठी चॅनल सुरु होण्याची शक्यता आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अर्णब गोस्वामी यांना अटक केली होती. याप्रकणी सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर कारागृहाबाहेर आलेल्या अर्णब गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले तसेच आपल्याला झालेली अटक ही अवैध असल्याचं सांगत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरही टीका केली.
अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे.
आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही अर्णब गोस्वामी यांनी यावेळी केली. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचं ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही,असंही त्यांनी म्हटले आहे.
टिप्पणी पोस्ट करा