जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
मुंबई :सध्या गाजत असलेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. गोस्वामी यांचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामीनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत. त्यामुळे अर्णब गोस्वामी यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
पेशाने वास्तूविशारद असलेल्या अन्वय नाईक यांनी अलिबागजवळच्या कावीर गावात 5 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असून नैराश्येत आत्महत्या करत असल्याचा आरोप अन्वय नाईक यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलं होतं. या प्रकरणी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांच्या तक्रारीनंतर अलिबागमध्ये 306 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अलिबाग पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.जामीन मिळावा, यासाठी अर्णब गोस्वामी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी (७ नोव्हेंबर) संपली. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश देऊ शकत नाही. आम्ही अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असं स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असंही न्यायालयाने नमूद केलं होतं.
न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने आज अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवरील निर्णय दिला. न्यायालयाने गोस्वामी यांची जामीनाची मागणी फेटाळून लावली. आमचे विशेषाधिकार वापरून तातडीचा अंतरिम जामीन देण्याचे प्रकरण नाही. त्यामुळे आरोपी कनिष्ठ न्यायालयात जाऊ शकतो. कनिष्ठ न्यायालय चार दिवसांच्या कालावधीत त्यावर निर्णय घेईल, असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अर्णब गोस्वामी यांच्याबरोबरच न्यायालयाने सहआरोपी नितीश सारडा आणि फेरोज शेख यांचीही जामीनाची मागणी फेटाळून लावली आहे.
नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण बंद करण्याची विनंती करणारा अहवाल रायगड पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात दाखल केला आणि न्यायालयानेही आमचे म्हणणे ऐकल्याशिवाय तो बंद केला. आम्हाला अंधारात ठेवण्यात आले, असा आरोप नाईक कुटुंबीयांतर्फे अॅड्. शिरीष गुप्ते यांनी केला. आताही न्यायालयाने आदेश दिल्यावर आम्हाला प्रतिवादी करण्यात आले. हे प्रकरण आधीच्या तपास यंत्रणेने मनमानीपणे हाताळले. आता त्याचा योग्य तपास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे तपास सुरू असताना आरोपींना उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन देऊ नये, अशी विनंती गुप्ते यांनी न्यायालयाला केली.
दरम्यान उच्च न्यायालयात सुनावणी होण्याच्या अर्धा ते एक तासापूर्वी अर्णब गोस्वामी यांनी जामीनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.तर दुसरीने चार दिवसात निकाल देण्याचे निर्देश हायकोर्टाने सत्र न्यायालयाला दिले आहेत. चार दिवसात सत्र न्यायालयात सुनावणी झाली नाही तर अर्णब गोस्वामी यांची दिवाळी तळोजा कारागृहातच होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा