नवी दिल्ली - कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशातील प्रत्येकजण आता लसची वाट पाहत आहे. येत्या काही आठवड्यात भारतात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली असतानाच भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी फायझर ही सर्वात पहिली कंपनी ठरली आहे.
मागील आठ-नऊ महिन्यांपासून देशातील नागरिक करोनाच्या दहशतीखाली जगताना दिसत आहे. देशातील करोनाची रुग्णवाढ कमी झाली असली, तरी भीती अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळे प्रत्येकाला आता प्रतीक्षा आहे ती करोना लसीची. भारतात करोना लस निर्मितीची प्रक्रिया वेगात सुरू असून, त्याआधीच परदेशातून लस येण्याची चिन्हं आहेत.
काही दिवसांपूर्वी ब्रिटनन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे.फायझरने भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडे कोरोना लसीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी मागितली आहे. सूत्रांच्या मते फायझरने 4 डिसेंबर रोजी DCGI कडे अशा प्रकारचा मागणी अर्ज केला आहे.
जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. पासष्ट वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते.
फायझरच्या या मागणीला मंजुरी दिल्यानंतर लसीच्या साठवणुकीचं भारतासमोर मोठं आव्हान असणार आहे. कोरोनावरील या लसीच्या साठवणुकीसाठी -70C तापमानाची आवश्यकता असते. खासकरुन ग्रामीण भागात या लसीचं वितरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. या प्रश्नावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने बैठका घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा