लोकसभेच्या ५४३ पैकी ४०० वर जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करीत 'अबकी बार ४०० पार' अशी घोषणा देत नरेंद्र मोदींनी लोकसभेच्या १८ व्या निवडणुकीत भाजपसह NDA आघाडीचे रणशिंग फुंकले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या नेतृत्वात खंडीभर विरोधकांचे INDIA आघाडी नावाने कडबोळे तयार झाले होते. निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. ५४३ पैकी भाजपने स्वतः २४० जागा जिंकल्या. भाजप आघाडीतील घटक पक्षांनी जिंकलेल्या जागांची संख्या धरून NDA ने २९३ जागा जिंकल्या आहेत. म्हणजेच ५४३ पैकी साध्या बहुमतासाठी २७२ जागा हव्यात. त्यातुलनेत NDA ला भक्कम बहुमत असून नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा आहे.
या निकालाचे विश्लेषण करताना पहिला ढोबळ निष्कर्ष हाच की, मोदींच्या नेतृत्वातील भाजप आघाडीने सलग तिसऱ्यांदा केंद्रातील सत्ता कायम ठेवली. दुसरा निष्कर्ष हाच की, मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होतील. पंतप्रधान पदावर यापूर्वी तीनवेळा स्व. इंदिरा गांधी बसल्या आहेत. तिसरा निष्कर्ष हाच की, २०१९ च्या निवडणुकीत भाजपने एकट्याने साध्या बहुमतापेक्षा जास्त ३०३ जागा मिळविल्या होत्या. यावेळी NDA आघाडी मिळून बहुमत गाठता आले आहे. INDIA आघाडी सर्व प्रकारचा विरोध दर्शवून २३४ जागा जिंकू शकली. अन्य पक्षांचे १६ जण निवडून आले आहेत. ते सर्व INDIA आघाडीकडे गेले तरी एकूण संख्या २५० होते. साध्या बहुमतापेक्षा २३ ने कमीच.
वरील तिसरा निष्कर्ष पुन्हा पुन्हा पुढे करीत काही विश्लेषक म्हणत आहेत 'हा मोदी विरोधात मतदारांनी दिलेला कौल आहे'. हे म्हणणे चलाखीचे आहे. सलग दहा वर्षे सत्तेत राहून भाजपने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्या निर्णयांमुळे दुखावलेल्या काही घटकांचे मतदान भाजप विरोधात जाणार हे निश्चित होते. दुसरीकडे 'भारत जोडो' हा नारा देत काँग्रेस सोबत एकत्र आलेले सर्व विरोधी पक्ष म्हणत होते, 'अबकी बार ... सत्ता के बाहर'. त्यांनी मोदींवर प्रचंड टीका केली. तरीही INDIA चे संख्याबळ २३४ पर्यंत पोहचले. म्हणजेच मतदारांनी फार फार तर बर्यापैकी संख्याबळ असलेल्या विरोधकांची जबाबदारी दिली.
भाजपच्या जागा २०१९ मधील निकालाच्या तुलनेत कमी झाल्या. म्हणून मतदारांनी मोदी - शहा - भाजपला धडा शिकवला असे चलाखीने काही जण म्हणतात. ३०३ वरून जागा २४० होणे हा जर भाजपसाठी धडा असेल तर शिवसेनेने एकत्रितपणे गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या १८ जागांच्या तुलनेत शिवसेना (उबाठा) ने जिंकलेल्या ९ जागा ही मतदारांची शाबासकी आहे का ? राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ला ८ जागा मिळाल्या. याच पक्षाला गेल्या निवडणुकीत ४ जागा मिळविल्या होत्या. त्यात ४ जागांची वाढ आहे. एकत्रित शिवसेना आणि आताची शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांचे राजकिय आयुष्य किमान २५ ते ६० वर्षांच्या वर आहे. त्यातुलनेत शिवसेना (एशिं) व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) यांचे आयुष्य अवघ्या वर्षभराचे आहे. तरीही शिवसेना (एशिं) ने ७ जागा व राष्ट्रवादी काँग्रेस (अप) ने १ जागा जिंकली. 'पक्ष पळवला - बाप पळवला' असे सतत प्रचारात म्हणणारे उद्धव ठाकरे १० चा आकडा मिळवू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांनी ७ जागा जिंकून त्यांना थप्पड लगावली. शिंदेंवर गद्दार, खोके ओके बोके आरोप होते. तरीही ते निवडणूक आयोगाच्या तक्त्यात स्वतःची जागा निर्माण करू शकले. अजीत पवार फार चमत्कार करू शकले नाहीत.
शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या पक्ष संघटनेच्या तुलनेत फारच जुजबी व नवख्या असणाऱ्या इतर पक्षांनी दोन अंकी खासदार निवडून आणले. शरद पवार यांना दोन अंकी संख्या यावेळीही मिळाली नाही. एकत्रित शिवसेनेने २०१४ व २०१९ मध्ये दोन अंकी संख्या गाठली होती. शरद पवार वयाच्या ८३ व्या वर्षी कन्या सौ. सुप्रिया सुळे हिच्या विजयासाठी परिश्रम करीत असताना त्यांच्यापेक्षा राजकारणात नवख्या असलेल्यांनी पक्षाला दोन अंकात समाधानकारक जागा मिळवून दिली आहे. यात अखिलेश यादवची समाजवादी पार्टी ३७ जागा, ममता बॅनर्जीची तृणमूल कॉंग्रेस २९ जागा, चंद्राबाबूची डीएमके २२, नितीशकुमारचे जनता दल संयुक्त १२ जागा मिळवून देशाच्या राजकारणात आपले अस्तित्व नव्याने निर्माण करीत आहेत. शरद पवार ८ संख्याबळाचे काय करणार ? २०२४ चा निकाल पवार यांच्यासाठी खरोखर मतदारांची शाबासकी आहे ? मराठा आरक्षण, जरांगे आंदोलन, देवेंद्र फडणवीसवर जातीला धरून टीका असे प्रचाराचे सर्व हातखंडे वापरून पवार यांना केवळ ८ जागा मिळाल्या.
यापेक्षा कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची अवस्था वाईट आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन निवडणुकीत काँग्रेस जागांची शंभरी गाठू शकलेली नाही. पणजोबा, आजी, बाप, आई, बहिण असा खानदानी पक्षाचा ७० वर्षांचा सत्ता उपभोगाचा इतिहास असताना राहुल आज एकहाती १०० जागा मिळवू शकत नाहीत. पण तिसर्यांदा सलग २०० वर जागा मिळवणारे मोदी यांच्यासाठी हा निकाल धडा शिकवणारा असू शकतो ? विश्लेषण करणाऱ्यांनी अशा प्रकारचा दावा करताना किती कोलांट उड्या माराव्या लागतात याचा अंदाज येतो. तसे करून तेच उघडे पडतात.
कोणत्याही निवडणुकीत विजेता हा केवळ एका मताने जास्त संख्येत ठरतो. त्यालाच 'जो जिता वो सिकंदर' म्हणतात. मोदी तिसर्यांदा भक्कम बहुमत घेऊन सत्तेत येणार आहेत. सत्तेच्या खेळात फोडाफोडी व तडजोडी घडविण्यात शरद पवार कुख्यात आहेत. थेट स्व. वसंतदादा पाटील, छगन भुजबळ मार्गे उद्धव ठाकरे पर्यंत. आताही नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू यांना भाजप आघाडीतून काढायला शरद पवार प्रयत्न करू शकतात. पवार यांच्या या राजकारणाला 'चाणक्यनिती' म्हणत टाळ्या वाजवणारे 'मोदीला धडा आणि पवार - ठाकरेंना शाबासकी' असे चलाखीने म्हणू शकतात. पती म्हणणे सुरू झाले आहे.
- दिलीप तिवारी
टिप्पणी पोस्ट करा