मुंबई: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! बहुप्रतीक्षित कुलाबा-वांद्रे-सीप्झ (मेट्रो 3) चा पहिला टप्पा 24 जुलै रोजी सुरू होणार आहे. हे ट्वीट केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून बुधवारी (16 जुलै) करण्यात आले होते. मात्र, काही वेळानंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्वीटवरून 'फेक न्यूज' पसरवल्याचा आरोप करत पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) तक्रार केली आहे.
'अक्वा लाइन' 24 जुलैपासून सुरू?
'अक्वा लाइन' नावाची ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो 33.5 किमी लांबीची आहे आणि आरे कॉलनी ते कफ परेडपर्यंत 27 स्टेशन असतील. @mygovindia या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 24 जुलै रोजी सुरुवात होणार असल्याची माहिती दिली गेली होती. अनेक भाजपा नेत्यांसह अनेक मान्यवरांनीही या ट्वीटला रिट्विट करत माहिती पसरवली होती. मात्र, ट्वीट डिलिट झाल्याने आता गोंधळ निर्माण झाला आहे.
गलगली यांचा आरोप काय?
या ट्वीटमुळे अनेकांचा गैरसमज झाला असल्याचे गलगली यांनी म्हटले आहे. "भारत सरकारने स्वतःहून 'फेक न्यूज' पसरवली आणि लोकांना दिशाभूल केली. त्यानंतर विनोद तावडे यांच्यासह अनेक मान्यवरांनीही चुकीची माहिती पसरवली," असे गलगली यांनी आरोप केले आहेत. या प्रकरणाची PMO द्वारे चौकशी व्हायला हवी आणि जबाबदारांवर कारवाई व्हायला हवी, अशीही त्यांची मागणी आहे.
आता काय?
ट्वीट डिलिट करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकृत सूत्रांकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. 24 जुलै रोजी मेट्रो 3 खरोखर सुरू होणार की नाही हे निश्चितपणे कळण्यासाठी आता अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागेल.
टिप्पणी पोस्ट करा