मुंबई: राज्यातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' या योजनेबद्दल काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या अहवालांमध्ये वित्तविभागाच्या विरोधाचा उल्लेख करण्यात आला आहे. या बातम्या निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजनमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे. पवार यांनी 'एक्स' वरून ट्वीट करत प्रसारमाध्यमांना अशा बिनबुडाच्या बातम्या देणे थांबवावे, असे आवाहन केले आहे.
पवार यांनी सांगितले की, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजना राज्याच्या वर्ष २०२४-२५ च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर करण्यात आली आहे. योजनेला वित्तविभाग आणि सर्व संबंधित विभागांचे तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच संमती मिळाली आहे. त्यामुळे ही योजना राज्याच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी आवश्यक ३५ हजार कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम तरतूद केली आहे.
अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रासारख्या आर्थिक दृष्ट्या संपन्न राज्याला ही रक्कम खर्च करणे शक्य आहे आणि या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्नच निर्माण होत नाही. या योजनेचा उद्देश राज्यातील माता, भगिनी आणि मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण आणि सर्वांगीण सक्षमीकरणासाठी आहे. त्यामुळे ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे आणि तिचा विरोध होऊ शकत नाही.
योजनेच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अधिकाधिक भगिनींना सहभागी करून घेण्याचे आवाहनही पवार यांनी केले आहे. राज्य सरकार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी अशा भ्रामक बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा