शरद पवारांनी मराठा - ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी: उमेश पाटील

 



मुंबई -  मराठा  समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे ही मनोज जरांगे यांची मागणी असून या मागणीला शरद पवार यांची आणि त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे हे महाराष्ट्रासमोर जाहीर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.


सोमवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यावर बोलताना उमेश पाटील यांनी शरद पवार गटाला कोंडीत पकडले आहे.


"शरद पवार हे वडीलधारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून त्यांच्याकडे महाराष्ट्र पहातो. त्यामुळे पक्षाचा विचार न करता राज्याच्या हितासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे काय तोडगा सूचवला आहे याचा खुलासा शरद पवार यांनीच करायची गरज आहे," असे उमेश पाटील म्हणाले.


लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने राज्यसरकारच्या विरोधात भूमिका घेतली. संविधान बदलाबाबत होणार्‍या अपप्रचारानंतर दलित समाजाने वेगळी भूमिका घेतली. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ज्या समाजाने शरद पवारांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मविआला पाठिंबा दिला. त्या समाजाची ओबीसीतून आरक्षण द्यावे ही जी प्रमुख मागणी आहे, त्याबाबत शरद पवारांनी स्पष्टपणे अद्यापपर्यंत भूमिका घेतलेली नाही. याला दुटप्पी भूमिका म्हणू शकतो असेही उमेश पाटील म्हणाले.


शरद पवार यांनी ज्येष्ठतेनुसार आणि मविआचे प्रमुख म्हणून भूमिका घेण्याची गरज आहे. ते राज्याचे चारवेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्यात शरद पवार यांचा सर्वात महत्त्वाचा रोल होता. किंबहुना महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण देण्यात शरद पवार यांचीच भूमिका राहिली होती. आरक्षणाची कायदेशीर बाब शरद पवार यांना चांगली माहित आहे असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने