धाराशिवच्या पत्रकारितेतील 'परडीवाल्यांची' साठा उत्तराची कहाणी

 


धाराशिव जिल्ह्याचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते पत्रकारितेचं मोठं साम्राज्य! पूर्वीच्या काळात प्रिंट मीडियाच्या सुवर्णयुगात पत्रकारांचं प्रमाण हाताच्या बोटांवर मोजता यायचं. पण, टीव्ही आणि डिजिटल मीडियाचं तुफान आलं आणि एकाच झटक्यात पायलीभर पत्रकार तयार झाले. आजच्या घडीला धाराशिवमध्ये ‘पन्नासहून’ अधिक पत्रकार आहेत आणि त्यांच्यामुळे आता पत्रकार परिषदा घेताना हॉल तर नाहीच, पण बुकिंगसाठी मॅनेजमेंटची गरज भासते!


पूर्वी धाराशिवमध्ये पत्रकारांची एकच संघटना होती, जणू पत्रकारांनी एकतर्फा खेळ केला असावा. आता मात्र सात-आठ संघटना तयार झाल्या आहेत आणि त्यातही गटबाजीची नवीनच फॅशन आलेली आहे. 'गट-तट'च्या या कलेमुळे पत्रकारांच्या बैठकीत "तुझा पक्ष कुठला ?" हा प्रश्न चहा मागवण्याआधीच विचारला जातो.


धाराशिवचं एकमेव पत्रकार भवन, जिथं पूर्वी पापनगरीवाल्यांनी कब्जा केला होता, तिथं आता स्वार्थीवाल्यांनी झेंडा रोवला आहे. त्यांचं लक्ष आहे की भवनाचं नाव बदलून 'स्वार्थ भवन' करावं की काय! पत्रकारांना बसायला जागा नाही, म्हणून आता पोलीस मुख्यालयासमोरील शासकीय रेस्ट हाऊस हा 'पत्रकारांचा नवाच अड्डा' झाला आहे. इथं काही तळीराम पत्रकार, रात्री ओली पार्टी करत असल्याचं बोललं जातंय. अर्थात, 'चर्चा आहे' म्हणजे आपण खऱ्या पत्रकाराच्या शिस्तीत हे गृहीत धरलं पाहिजे!


दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चिंचेच्या झाडाखाली बसणारे काही ‘झाडू’ पत्रकार, म्हणजे 'झाडाखालील चिंचुक्यांची पत्रकार मंडळी' आपल्या कामात मग्न असतात. साहेबाला कुणी  निवेदन द्यायला आले की, हे पत्रकार त्याला 'बातमीच्या नावाखाली' पैसे उकळून त्याची केस कव्हर करतात. तुळजापूरच्या देवीच्या परड्यांसारखी, या पत्रकारांनी पत्रकारितेची परडी जवळ ठेवली आहे. कुणी ५० रुपये, कुणी १०० रुपये टाकतो, आणि दिवसभरात ५०० रुपये मिळवून ‘झाडाखालील चिंचुक्या’ समाधानाने परत जातात.


धाराशिवच्या पत्रकारितेत आजही ‘परडीवाल्या पत्रकारांची’ चढाओढ आहे. पत्रकारिता करायची ती झाडाखाली बसून, पावसाच्या चिंचांच्या छायेत!

- बोरूबहाद्दर 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने