राज्यातील शिंदे सरकारने निवडणुकीच्या तोंडावर आणखी एक मास्टरस्ट्रोक मारत गायीला ‘राज्यमाता’चा दर्जा दिला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याचे समजते. शेतकऱ्यांनी या निर्णयावर सण साजरे करायला सुरुवात केली आहे, पण त्यांच्या मनात काही गंभीर प्रश्नही निर्माण झाले आहेत.
गायींना ‘राज्यमाता’ म्हटल्यावर, अनेक शेतकरी विचार करत आहेत की, आता भाकड गायींना थेट मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर बांधायचं का? "भाकड गायी पोसण्याचं काम आमदार-खासदार करतील का? का आम्हीच नेहमी प्रमाणे ही सगळी जबाबदारी घ्यायची?" असा सवाल एका नाराज शेतकऱ्याने केला.
काही शेतकरी अजूनही गोंधळलेले आहेत, "आम्हीच गायीचं संगोपन करतो, मग अनुदान गोशाळांना का मिळतं? आम्ही गायी सांभाळून नेमकं कोणाचं उपकार करत आहोत?" असा तिखट सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
दरम्यान, विविध हिंदू संघटनांनी या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे, त्यांना वाटतंय की राज्यमाता गायींच्या जोरावर निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारला मोठं यश मिळेल. शिंदे सरकारचं हे आणखी एक धाडसी पाऊल नेमकं कुठे घेऊन जाणार, हे पाहण्यासाठी सगळ्यांचं लक्ष आता आगामी निवडणुकांकडे लागलं आहे.
गायींना मिळालेला 'राज्यमाता' दर्जा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देईल की आणखी काही गोवऱ्या उचलायला लावेल, हे मात्र काळच ठरवेल!
टिप्पणी पोस्ट करा