तासगावमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळची जंगी लढत !

जनता म्हणणार “राम कृष्ण हरी” की “टिक-टिक”?


सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा निवडणूक यंदा खऱ्या अर्थाने रंगतदार ठरणार आहे. हा तालुका म्हणजे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील  यांचा परंपरागत गड. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीने राजकीय कार्यभार सांभाळला, आणि आता त्यांचा चिरंजीव रोहित पाटील, जो आता २४ वर्षांचा झाला आहे, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात उतरत आहे. शरद पवारांनी रोहितच्या हातात 'तुतारी' देऊन त्याला तासगावच्या रणांगणात उतरवले आहे, आणि रोहितचे निवडणूक चिन्हसुद्धा "तुतारी" आहे.


या लढाईत रोहितच्या समोर मैदानात आहेत अनुभवी राजकारणी संजयकाका पाटील. संजयकाकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत 'सत्ताबदलाचा खेळ' असा काही खेळला आहे की त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीत जाऊन विधान परिषदेचे आमदार झाले, त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून मोदी लाटेत दोनदा खासदार म्हणून निवडून आले. मात्र मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांनी संजयकाकांचा एक लाख मतांनी पराभव केला. हा पराभव संजयकाकांना चांगलाच जिव्हारी लागला आणि त्यांनी आता आमदारकीसाठी तासगावची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.


संजयकाका नेहमीप्रमाणे सल्ल्याला "महाराज आणि बुवां" च्या आश्रयाला गेले. कारण काकांच्या आलिशान गाडीत नेहमी कोणता ना कोणता महाराज असतोच. हे सर्व सल्ले मिळवल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला. आता काकांची तयारी आहे "घड्याळ" घेऊन पुन्हा तासगावकरांच्या दरबारी जाण्याची.


विशेष बाब म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्याने दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीचेच आहेत, पण दोन वेगवेगळ्या गटांचे. शरद पवार गटाकडून तुतारी घेऊन रोहित पाटील उभे आहेत, तर अजित पवार गटातून घड्याळ घेतलेले संजयकाका पाटील. तासगावमध्ये आता नागरिकांना हेच कळत नाही की कोणता "पवार" निवडायचा!


या लढाईने गावकऱ्यांच्या चर्चेला उधाण आलं आहे. काही जण “राम कृष्ण हरी” म्हणत तुतारीचा समर्थन करतायत, तर काही “टिक टिक” म्हणत घड्याळाच्या गजरात रमलेत. जनता आता या नव्या आणि जुन्या चेहऱ्यांचा मुकाबला पाहण्यास उत्सुक आहे.


२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानात तासगावच्या जनतेने नेमकं कोणाला पसंती दिली? तुतारीचा आवाज वाजणार की घड्याळाचा गजर होणार? हे सर्व निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल. तासगावमध्ये सध्या फक्त एकच गूढ प्रश्न आहे – "राम कृष्ण हरी , घ्या तुतारी म्हणणार की घड्याळचा गजर करणार?"


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने