बीड जिल्ह्यात चालू असलेल्या थरारक राजकीय-गुन्हेगारी नाट्यात एक नवीन ट्विस्ट आला आहे – आणि यावेळी तो पलंगांभोवती फिरतोय! मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संशयित वाल्मिक कराड याला बीड शहर पोलीस कस्टडीत ठेवण्यात आलं आहे. पण खरी बातमी ही आहे की, बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या पाच नवीन लोखंडी पलंगांवर मीडियाने प्रचंड प्रकाशझोत टाकलाय.
बीड शहर पोलीस स्टेशनची इमारत नवीन आहे. त्यासाठी दररोज काही ना काही नवीन सामान येत आहे. त्यात पाच लोखंडी पलंग आले आणि याबाबात संशय व्यक्त करणारी पहिली बातमी न्यूज १८ लोकमतने दिली, ज्यात त्यांनी या पाच पलंगांना "आरोपींच्या बडदास्ती"साठी आलेलं घोषित केलं. मग काय, इतर चॅनलवाल्यांना धक्का बसला! त्यांच्या संपादकांनी आपापल्या पत्रकारांना झापायला सुरुवात केली – "तुम्ही ही पलंग-बातमी कशी चुकवली?" त्यामुळे बीडच्या गल्लीबोळांपासून ते पोलीस स्टेशनच्या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांनी 'पलंग सत्य' उघड करण्यासाठी मोहीम हाती घेतली.
वाल्या ते वाल्मिक आण्णा – 'रोलिंग स्टोरी' याचदरम्यान, पत्रकारांनी गुन्हेगारी इतिहासात खोलवर शिरकाव केला आहे. भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जुना घरगडी वाल्या कसा 'वाल्मिक आण्णा' झाला, याचं जिवंत चित्रण आता सोशल मीडियावर वाचायला मिळतंय. पत्रकारांनी इतका तपशीलवार अभ्यास सुरू केला आहे की, लवकरच 'वाल्मिक : द बायोग्राफी' मार्केटमध्ये येईल अशी चर्चा आहे.
बीड पोलीस स्टेशन – पत्रकारांचा नवीन वसाहत बीड पोलीस स्टेशनचं काय वर्णावं! सीआयडी आणि एसआयटी तपास तर सुरूच आहे, पण इथं पत्रकारांनी तळ ठोकला आहे. कॅमेऱ्यांच्या चमचमत्या लाइट्सखाली पलंगांची 'इन्स्टॉलेशन सेरेमनी' होत आहे. आता पोलीसही विचार करतायत, "आम्ही गुन्ह्याचा तपास करू की पलंगांचा?"
पलंग 'बेकायदेशीर' नाही, पण बातमी ठरली या प्रकरणात पलंगांचा काहीही संबंध नसला तरीही, त्यांनी बीडच्या राजकीय वर्तुळाला आणि पत्रकारितेला झुलवत ठेवलंय. पुढच्या वेळी बीड पोलीस स्टेशनला नवीन खुर्च्या आल्या तरी मीडियाकडे बुलेटिन तयार आहे – "खुर्च्यांमागचं खरं सत्य!"
तर वाचकहो, बीडमध्ये पलंगांचं राजकारण आणि पत्रकारांचं पॅशन पाहता, पुढील काही दिवस इथं 'ब्रेकिंग न्यूज'चा जोरदार पाऊस पडणार, हे निश्चित!
Video
टिप्पणी पोस्ट करा