धाराशिव : चिंचेच्या झाडाखालील 'गाढव पत्रकार" !


अहो, ऐकलंत का? धाराशिव जिल्हाधिकारी कचेरीसमोर एक साधंसुधं चिंचेचं झाड नाहीये, ते तर आहे काही 'युट्युब पत्रकार' मित्रांचं कमाईचं एटीएम! आता तुम्ही म्हणाल, झाडाखाली कसलं आलंय एटीएम? तर मंडळी, गंमत तिथेच आहे. या झाडाखाली काही युट्युब पत्रकार मित्र ठाण मांडून बसलेले असतात, ज्यांना प्रेमाने (की नाइलाजाने?) 'गाढव पत्रकार' म्हटलं जातं म्हणे!

त्यांचं काम काय? अहो, सोप्पं आहे! कचेरीत कुणीतरी साहेब, पुढारी किंवा कार्यकर्ता निवेदन घेऊन आला रे आला, की यांचे कान लगेच हरणासारखे टवकारतात. निवेदन देणाऱ्याला पण जरा बातमीचा, फोटोचा, म्हणजे थोडक्यात 'पब्लिसिटी स्टंटचा' मोह आवरवत नाही. मग काय, साहेबांशी बोलणं होतं, झाडाखालच्या 'पत्रकारांशी' पण डील पक्की होते. ५०० काय, १००० काय, जसा स्टंट तसा दाम!

मग या मिळालेल्या 'लक्ष्मी'चं काय होतं? तर तिचं होतं न्याय्य वाटप! प्रत्येकाच्या वाट्याला कधी ५० रुपये येतात, तर कधी १००. दिवसभरात असे ५००-७०० रुपये जमले की स्वारी खुशीत! जणू काही मोठी संपादकीय कामगिरीच फत्ते केली! चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो.

आता यातली खरी मेख ऐका. एका पठ्ठ्याला तर म्हणे, साधं आपलं नाव आणि चार ओळी बातमीच्या लिहिता येत नाहीत. पण हुशारी बघा, त्यावरही तोडगा काढलाय! त्याने चक्क एक कारकून पत्रकार कामाला ठेवलाय. सगळा पत्रकारितेचा डोलारा त्या कारकुनाच्या जीवावर सुरू आहे. तो लिहितो, हे नाव लावतात! क्या बात है!

पण यांचं खरं दुःख सुरू होतं शनिवार, रविवार आणि सरकारी सुट्ट्यांच्या दिवशी. कचेरी बंद, येणारे-जाणारे बंद, त्यामुळे कमाईचं 'चिंचेचं झाड' पण शांत! मग ही सगळी 'गाढवं' होतात जाम बोअर. झाडाखाली बसून तरी काय करणार? पोटात भूकेचा आगडोंब उसळलेला असतो.

मग सुरू होतो दुसरा शोध! यांचे डोळे गरगरा फिरायला लागतात. आज कुणाची पार्टी आहे? कुणाकडे जेवणावळ आहे? अरे, तो कार्यकर्ता काल भेटला होता, त्याच्याकडे काही बेत असेल का? सुट्टीचा दिवस वाया नाही ना जाणार? निदान पोटपूजा तरी व्हावी! अशी त्यांची सुट्टीच्या दिवशीची चिंता असते, म्हणूनच त्यांना 'चिंतामणी' पत्रकार म्हणायला हवं!

अशी आहे ही धाराशिवच्या कचेरीसमोरच्या चिंचेच्या झाडाखालची अजब 'गाढव पत्रकारिता'! जिथे बातमीपेक्षा स्टंट मोठा, स्टंटपेक्षा कमाई मोठी आणि कमाईपेक्षा सुट्टीच्या दिवसाची पार्टी सर्वात मोठी!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने