धाराशिवची ‘शबनम’ पत्रकारिता: शिक्षकांनाच शिकवला (उलटा) धडा!

 


मंडळी, सादर आहे धाराशिवच्या ‘गाढव पत्रकारितेचा’ आणखी एक नमुना! मागच्या वेळी आपण एका माऊलीची कथा ऐकली, आता ऐका शिक्षकांसोबत घडलेला विनोदी किस्सा. स्थळ तेच – जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचं मैदान!

झालं असं की, काही शिक्षक बांधव आपल्या हक्कांसाठी, मागण्यांसाठी तिथे उपोषणाला बसले होते. बिचारे न्यायाच्या प्रतीक्षेत गंभीरपणे आपलं म्हणणं मांडत होते. तेवढ्यात एन्ट्री झाली एका ‘शबनम गाढवाची’! (आता हे नाव कुणी ठेवलं, कशावरून ठेवलं, यावर संशोधन करायला हवं!).

या बहाद्दराने थेट एका उपोषणकर्त्या शिक्षक मॅडमला गाठलं. सहानुभूतीचे दोन शब्द बोलायचे सोडून, थेट विचारलं, ‘मॅडम, बातमी लावायची आहे हो! आमचा  भत्ता देणार का ?’

मॅडम जरा चक्रावल्याच. म्हणाल्या, ‘अहो काय बोलताय? तुमची पत्रकारिता काय पैशावर चालते का?’

यावर तो ‘ज्ञानी’ पत्रकार काय म्हणतो बघा, ‘अहो मॅडम, मग तुम्ही काय शाळेत फुकट शिकवता का?’ (वाह! काय लॉजिक आहे!). एवढ्यावरच तो थांबला नाही, मॅडमना एक मोलाचा (?) सल्लाही देऊन टाकला. म्हणाला, ‘तुमच्या याच पैसे न सोडण्याच्या वृत्तीमुळे तुमचं थकीत वेतन मिळत नाही बघा!’ (काय डोकं चालवलंय बघा! म्हणजे शिक्षकांनी स्वतःचा अडकलेला पगार मिळवण्यासाठी आधी यांना ‘प्रसाद’ द्यायचा!) 

🤣🤣🤣

हे ऐकून मॅडमला हसूच आवरवलं नाही. असल्या अजब तर्कावर काय बोलणार? त्या शांतपणे म्हणाल्या, ‘अहो, तुम्ही कशाला काळजी करता? आमचं काय व्हायचं ते कोर्टाच्या निर्णयाने होईल. तुम्ही नका टेन्शन घेऊ.’

बस्स! झालं! ‘शबनम गाढव’ तिथून गायब! जणू काही उपोषण कधी झालंच नव्हतं! पैसा नाही, तर बातमी पण नाही! अर्थात, तो तिकडे फिरकला सुद्धा नाही.

नंतर अर्थातच, काही खऱ्या आणि चांगल्या पत्रकारांनी येऊन त्या शिक्षकांची व्यथा, त्यांची बातमी व्यवस्थित कव्हर केली.

पण या ‘शबनम गाढवा’च्या प्रतापामुळे एक गोष्ट मात्र नक्की कळली – धाराशिवमध्ये पत्रकारितेचे असे ‘मोलवान’ धडेही दिले जातात!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने