मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध नदीकाठी जाऊन काळ्या बाहुल्या बांधणारे विरोधक कोण ?


सोलापूर-  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा खमका आणि हटके बाणा सध्या चर्चेत आहे! मंत्रीसाहेब म्हणतात की, त्यांच्या विरोधात निवडणुकीला उभं राहिलं की विरोधक नदीकाठी जाऊन काळ्या बाहुल्या बांधतात आणि सकाळ-संध्याकाळ पूजा करतात. इतकंच काय, त्यांनी काही जणांना रोज नदीकाठी 'गोरे-विरोधी यज्ञ' चालवताना बघितलंय! पण मंत्रीसाहेब म्हणतात, "माझ्या मागे देवाभाऊ आणि भाजप आहे, त्यामुळे माझं कुणी वाकडं करू शकत नाही."

तर मंत्रीसाहेबांच्या शिकार धोरणाचाही उल्लेख आहे. ते म्हणतात, "मी कोणाच्या नादाला लागत नाही, पण माझ्या नादाला कोणी लागायचं नाही. सावज टप्प्यात आल्याशिवाय हात लावत नाही!" थोडक्यात, मंत्रीसाहेबांचं निशाण साधूनच लक्ष केंद्रित असतं.

आता मंत्रीसाहेब म्हणतात, "सावज टप्प्यात आलंय, थोडी वाट बघा." ही वाट पाहत असतानाच एक वेगळीच गोष्ट घडली! एक महिला मंत्रीसाहेबांवर गंभीर आरोप करत खंडणी मागायला आली आणि १ कोटी घेताना पोलिसांनी तिला पकडलं! हे म्हणजे सावज हेरलं आणि फास ओढला!

इतकंच काय, मंत्रीसाहेबांनी तुषार खरात नावाच्या पत्रकारा विरोधातही गुन्हा दाखल केला, आणि त्याच्यावर आट्रोसिटी, विनयभंग, खंडणी यांसारखे गुन्हे दाखल झालेत. खरातसाहेबांची पोलिस कोठडीत रवानगी झालीय, आणि मंत्रीसाहेबांचा सावज शिकार यशस्वी ठरला आहे!

तर गोष्टीचा निष्कर्ष असा की, काळ्या बाहुल्या कितीही बांधल्या तरी मंत्रीसाहेबांच्या सावजाची शिकार अचूक असते! आता पाहायचं एवढंच की, पुढील निवडणुकीत कोण नवा शिकार होतोय आणि कोण नदीकाठच्या नवसाला वाहून जातंय!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने